Vaishwik Pratibha Sangam.png

श्रीदत्त देवस्थान महासंस्थानम अहमदनगर

प.पू. सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज हे शिवापासून चालत आलेल्या थोर गुरुपरंपरेतील सद्गुरु आहेत. गुरुदेवांचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८५५ (१६ फेब्रुवारी १९३४) रोजी नगर जिल्ह्यातील रायतळे या गावी झाला. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि त्रिकालज्ञान झाले. आपल्या जीवनकार्याची त्यांना कल्पना आली. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना श्री दत्तात्रेयांनी गाणगापूर येथे स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला आणि साधना करण्यास सांगितले.

श्रीदत्त देवस्थान महासंस्थानम अहमदनगर

प.पू. सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांचे अवतार कार्य: 

              प.पू. सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज हे शिवापासून चालत आलेल्या थोर गुरुपरंपरेतील सद्गुरु आहेत. गुरुदेवांचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८५५ (१६ फेब्रुवारी १९३४) रोजी नगर जिल्ह्यातील रायतळे या गावी झाला. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि त्रिकालज्ञान झाले. आपल्या जीवनकार्याची त्यांना कल्पना आली. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना श्री दत्तात्रेयांनी गाणगापूर येथे स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला आणि साधना करण्यास सांगितले.

             २५ वर्षे कठोर तपश्चर्या झाल्यानंतर स्वामींनी पुन्हा दर्शन दिले व त्यांच्यावर वेदविद्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य सोपवले. येथून पुढे गुरुदेवांचे अवतार कार्य सुरू झाले व त्यांनी लोकांना दर्शन देण्यास सुरुवात केली. त्यांच्या दर्शनातून सामान्य जीवांचा उद्धार होऊ लागला. ‘दर्शने दोष नासती’, ‘दर्शने मनःकामना पुरती’ ह्या उक्तींचा अनुभव येऊ लगाला. हळूहळू गुरुदेवांभोवती भक्तगणांची दाटी होऊ लागली. गुरुकार्यासाठी हजारो भक्त पुढे आले आणि वेदविद्या संरक्षण-संवर्धनाचे कार्य आकार घेऊ लागले. सद्गुरूंनी सर्व कार्य शिष्यांच्या मार्फत भिक्षेच्या माध्यमातून उभे केले आहे. रामदास स्वामींनी ज्याप्रमाणे आपल्या शिष्यांना घरोघरी जाऊन भिक्षा मागण्यास सांगितले त्याप्रमाणे सद्गुरूंनी भक्तांना घरोघरी जाऊन धर्मासाठी भिक्षा मागण्यास सांगितले. त्यासाठी सत्संग मंडळे स्थापन केली. गुरुदेवांच्या मुखातून ज्ञानगंगा अखंड वाहत असे. त्यातून अनेक गूढ, गहन विषयांची उकल गुरुदेव अगदी साध्या, सोप्या भाषेत करीत. त्यांच्या रसाळ, मधुर वाणीतून प्रकटणारे अमृत बोल गुरुवाणी, रामकृष्ण उवाच, नित्यगुरूवाणी, अमृतकलश इ. ग्रंथातून सामान्य माणसांना धर्माचरणाचा मार्ग दाखवत आहेत. वेदकार्याबरोबरच नीतीमान समाज घडविण्याचे कार्य गुरुदेव आजही अव्याहतपणे करीत आहेत.  गुरुदेवांनी श्रावण  वद्य  चतुर्दशी  शके  १९२१ (८ सप्टें. १९९९) रोजी आपला देह पंचत्वात विलीन केला, तरी त्यांनी हाती घेतलेले कार्य ते आजही भक्तांकरवी करून घेत आहेत.

             आजमितीला संपूर्ण महाराष्ट्रभर असलेली सत्संग मंडळे सद्गुरूंचे कार्य घरोघरी पोचविण्याचे कार्य करीत आहेत. भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्राबाहेरही नवनवीन सत्संग मंडळे तयार होत आहेत. यातूनच एक आध्यात्मिक चळवळ संपूर्ण भारतभर पसरत आहे. पुढील काळात ही संपूर्ण विश्वात पसरणार आहे व वैदिक धर्माचा ध्वज अखिल विश्वात फडकत रहाणार आहे. वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचे जे कार्य श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी १२०० वर्षांपूर्वी केले तेच कार्य प. पू. सद्गुरु आज करीत आहेत.  संपूर्ण विश्वाला सुखशांतीच्या मार्गावर नेणाऱ्या वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचा हा यज्ञ प.पू. गुरुदेवांनी सर्वस्व त्यागून पेटविला आहे. ह्या यज्ञात आहुती टाकण्याची संधी ते प्रत्येकाला देत आहेत. यातूनच अखिल मानवजातीचा उद्धार होणार आहे. 

  संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा